पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात, कार-ट्रकच्या धडकेत बाप-लेकासह चौघे जागीच ठार..


पुणे : भरधाव मोटारीने थांबलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार, तर तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात सोमवारी (ता. ४) सकाळी ७.१५ च्या दरम्यान पुणे-बंगळूर महामार्गावरील चित्रदुर्गजवळ घडला आहे.

शमशुद्दीन मक्तुमसाब शेख (वय ५७), तबरेज शमशुद्दीन शेख (१२, दोघेही रा. धामणे रोड, विष्णू गल्ली, वडगाव), खलील शरिफ (४६), मलिका खलिल शरिफ (४५, दोघेही रा. तुमकूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. रिहान शरिफ (वय १२), रेहमान (वय १०) आणि महजबीन (वय ७, तिघेही रा. तुमकूर) अशी जखमींची नावे आहेत.

मृतांपैकी दोघे बाप-लेक विष्णू गल्ली वडगाव येथील असून, दोघे पती-पत्नी तुमकूर येथील आहेत. तिन्ही जखमी मुलांवर चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. अपघाताची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,मलिका हिचे माहेर विष्णू गल्ली वडगाव असून, त्या गेल्या चार दिवसांपूर्वी पती आणि आपल्या तीन मुलांसह माहेरी भावाकडे आल्या होत्या. काल (ता. ३) रात्री ते तुमकुरला परत जाण्यासाठी मोटारीतून रात्री १ च्या सुमारास बेळगावहून रवाना झाले. त्यांच्यासोबत भाऊ शमशुद्दीन आणि मुलगा तबरेज यांच्यासह एकूण सात जण होते. खलिल हे मोटार चालवत होते.

सकाळी ७.३० च्या दरम्यान मल्लापूर- गोल्लरट्टी (चित्रदुर्गजवळ) आले असताना त्यांच्या मोटारीची महार्गाच्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. यात चौघेजण जागीच ठार झाले, तर तीन मुले जखमी झाली.

अपघाताची माहिती समजताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेवून मोटारीत अडकून पडलेल्या तिन्ही मुलांना तातडीने उपचासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती देखील चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!