पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात; 20 वर्षीय लेकीने बापासमोर सोडला जीव, चाकाखाली चिरडून तरुणीचा मृत्यू..

पुणे : पुण्यातील आयटी पार्क हिंजवडी परिसरात डंपरच्या धडकेने तरुणीचा जागीच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डंपर ट्रक चालकाने एका तरुणीला चाकाखाली चिरडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय 20 वर्ष )या तरुणीचा वडिलांसमोर मृत्यू झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, तन्वी साखरे ही तरुणी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. तन्वी दुचाकी चालवत होती तर तिचे वडील मागच्या सीटवर बसले होते. याचदरम्यान मागून येणाऱ्या एका डंपरने अचानक वेगात दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की बापलेक दोघेही रस्त्यावर फेकले गेले. तन्वी दुर्दैवाने थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली आली आणि काही क्षणातच तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे वडील यामध्ये थोडक्यात बचावले असले तरी धक्क्यातून सावरू शकत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी घटनास्थळाहून पळ काढला. नागरिक आणि प्रवाशांनी त्वरित पोलिसांना माहिती दिल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम राबवली. अनेक तासांच्या तपासानंतर अखेर सायंकाळच्या सुमारास आरोपी डंपर चालक अजय ढाकणे याला अटक करण्यात आली आहे.

हिंजवडीसारख्या वर्दळीच्या भागात RMC ट्रक, डंपर आणि मोठ्या मालवाहू वाहनांची अनियंत्रित वाहतूक ही गेल्या काही महिन्यांपासून मोठी समस्या बनली आहे. सकाळ-संध्याकाळ आयटी पार्कला जाण्या-येण्याच्या वेळी या वाहनांचा वेग, नियमांकडे केलेले दुर्लक्ष आणि वाहतूक पोलिसांची कमी उपस्थिती यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
