शिंदवणे येथे भीषण अपघात, दोन्ही तरुणांचा उपचारादरम्यान मृत्यू; परिसरात हळहळ ..

उरुळी कांचन : जेजुरी-उरुळी कांचन रस्त्यावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातातील जखमी दोन्ही तरुणांचा मंगळवारी (ता. 16) सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात गुरुवारी (ता. 11) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता.
समीर संभाजी ढमढेरे (वय 21), व सार्थक विजय ढमढेरे (वय 20, दोघेही रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही तरुणांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी याप्रकरणी दीपक दत्तात्रय ढमढेरे (वय 20, धंदा शिक्षण रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात टेम्पोचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दिपक ढमढेरे, समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे तिघे युवक दुचाकीहून गुरुवारी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेले होते. देवदर्शन घेऊन पुन्हा घरी येत असताना शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील वाकवस्ती परिसरात टेम्पो दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या धडकेत दुचाकीवरील समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे दोघे गंभीर तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाले होते. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील रुग्णालयात उप्चारासाठे दाखल करण्यात आले होते. तसेच पुढील उपचारासाठी पुण्यातील एका बड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर टेम्पोचालक टेम्पो जागेवर सोडून पळून गेला होता.

दरम्यान, उपचार सुरु असताना मंगळवारी (ता. 16) सकाळच्या सुमारास समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या दोन्ही युवकांवर मंगळवारी तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्याही मृत्यूबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार उद्धव गायकवाड करीत आहेत.
