पुणे जिल्ह्याच्या सुपुत्राचा सन्मान! पोलीस निरीक्षक’अविनाश शिळीमकर’ यांना राष्ट्रपती पदक जाहीर


पुणे : यंदा भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस,अग्निशमन होमगार्ड, सुधारक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात. या निमित्ताने पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रभावी सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालेī आहे.

कोण आहेत अविनाश शिळीमकर?

भोर तालुक्यातील तांबड, गुंजन मावळ हे शिळीमकर यांचे मूळ गाव आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले, तर पदवी शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून घेतले. सन १९९३ मध्ये त्यांनी पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईतील येलो गेट, वडाळा आणि एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यांतून त्यांनी सेवा बजावली.

यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखा आणि सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखा अशा विविध ठिकाणी त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांचा एकूण सेवाकाल तब्बल ३२ वर्षांचा आहे.

सेवाकाळात त्यांनी अनेक कुख्यात गुन्हेगार टोळ्यांना जेरबंद करत महत्त्वपूर्ण यश मिळवले. पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत असताना ऊरुळी कांचन परिसरातील कुख्यात आप्पा लोंढे टोळीवर कारवाई करून परिसरातील गुन्हेगारीवर आळा घातला.

नागपूर शहरात कार्यरत असताना खून, दरोडा, खंडणीसह तब्बल ३८ गंभीर गुन्हे उघडकीस आणत कुख्यात राजा गौस टोळीचा पर्दाफाश केला. तसेच संतोष आंबेकर टोळीवर कारवाई करून नागपूर शहरातील दहशत संपुष्टात आणण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला.

नोव्हेंबर २०२२ पासून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना दरोडा, जबरी चोरी, घरफोडी तसेच आंतरराज्यीय गुन्हेगार टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे अविनाश शिळीमकर हे पोलीस दलातील आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली असून त्यांच्या या राष्ट्रपती पदकाच्या सन्मानामुळे पुणे जिल्ह्याला पुन्हा एकदा गौरव प्राप्त झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!