हिट अँड रन प्रकरण ; पुणे सत्र न्यायालयाचा कारचालकाला दणका, जामीन अर्ज आठव्यांदा फेटाळत कोर्टाने थेट…..

पुणे : कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावरील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपीने एका मागून एक तब्बल आठ वेळा जामिनीसाठी अर्ज करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने या कारचालकाचा जामीन अर्ज फेटाळला असून, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करून न्यायालयांची दिशाभूल केल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकरण?
आयुष प्रदीप तायाल(वय 34, रा. मगरपट्टा सिटी)असे आरोपीचे नाव आहे. दीडच्या सुमारास दारूच्या नशेत ऑडी कार भरधाव चालवून 21 वर्षीय डिलिव्हरी बॉय असणाऱ्या रौप शेख या डिलिव्हरी बॉयला चिरडले. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.रौफ शेखच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयुषविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना 11 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर घडली.
दरम्यान या गुन्ह्यात आरोपी आयुष तायाल याने आठव्यांदा सत्र न्यायालयात जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सरकारी वकील जावेद खान यांनी याला तीव्र विरोध केला. अखेर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी एक लाख रुपयाचा ठोठावला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा आदेश दिला. आरोपीने स्वच्छ हाताने न्यायालयात येण्याऐवजी खोटेपणा, दिशाभूल आणि माहिती लपविण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर झाला असून, न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला; तसेच जनतेचा निधी असलेल्या सरकारी तिजोरीवरही ताण आला, अशी गंभीर निरीक्षणे नोंदवून न्यायालयाने आरोपीला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. आरोपीने दंडाची रक्कम 15 दिवसांत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.