धक्कादायक! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, घटनेने उडाली खळबळ…

लातूर : एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली आहे. पोलिसांनी घडल्या प्रकाराचा अवघ्या २४ तासांत छडा लावल्याने या घटनेचं सत्य उलगडलं आहे.

तसेच डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. विशेष म्हणजे, या बनावासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाचा खून करण्यात आल्याची खळबजनक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मृताचे वय अंदाजे (वय. ३५) वर्षे असल्याचे सांगण्यात येत होते.

वाहनात सापडलेल्या काही वस्तूंवरून हा मृतदेह औसा तांडा येथील गणेश चव्हाण याचा असल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. तपासादरम्यान गणेश चव्हाण याच्या कॉल डिटेल्स तपासण्यात आल्या.
दरम्यान, त्यातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आणि अखेर अवघ्या २४ तासांत गणेश चव्हाण जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून तो फरार झाल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. दरम्यान, याप्रकरणी, पोलिस पुढील तपास करत असून आरोपीविरोधात खून, फसवणूक व इतर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.