हिंदू शेरनी, तू काही दिवसांचीच…; पाकिस्तानमधून भाजप नेत्या नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी….

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या फोनवरून जीवे मारण्याच्या धमकी त्यांना देण्यात आली आहे.
या धमकी कॉल्सबाबत नवनीत राणा यांनी मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. नवनीत राणा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना पाकिस्तानमधून आलेल्या फोन कॉल्सवर अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह भाषेत धमकी देण्यात आली.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले की, आमच्याकडे तुझी संपूर्ण माहिती आहे. हिंदू शेरनी, तू काही दिवसांचीच पाहुणी आहेस. तुला आम्ही संपवून टाकू. ना सिंदूर वाचेल, ना सिंदूर लावणारी वाचेल. या धमकीमुळे नवनीत राण यांच्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मागील वर्षी नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती. त्यांच्या व्हॉटसऍप क्रमांकावर क्लिप पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. आता पुन्हा राणा यांना धमकी आल्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.