‘मातोश्री’वर हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय घडलं?


मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गट ॲक्शन मोडवर आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे आक्रमक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटातील खासदारांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या नाराजी आणि संभाव्य फुटीच्या चर्चेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर देत खासदारांची खरडपट्टी केली आहे. “ज्यांना सत्ताधाऱ्यांकडे जायचे आहे, त्यांनी आत्ताच सांगावे,” अशा कडक शब्दांत ठाकरेंनी उपस्थित खासदारांना सांगितले असल्याचे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत खासदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही,अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वरिष्ठ नेत्यांसमोर वाचला होता.

पक्षातील नाराजी नाट्यानंतर ठाकरेंनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत खासदारांची समजूत काढण्याऐवजी ठाकरेंनी थेट आक्रमक भूमिका घेतली. “जे सोबत राहतील त्यांनी पूर्ण निष्ठेने लढावे, अन्यथा ज्यांना सत्ताधाऱ्यांसोबत जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे,” असे त्यांनी बजावले असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!