हायव्होल्टेज ड्रामा! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून मुरलीधर मोहोळ यांची माघार? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार..

पुणे : येत्या दोन नोव्हेंबर रोजी होणारी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली असताना शुक्रवारी झालेल्या बैठकीत मोठी घडामोड घडली आहे.या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमनेसामने येणार आहेत. मात्र, दोन्ही गटातील उच्च पदस्थांची बैठक होऊन यात मोहोळ यांनी माघार घेण्याचे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे.

राज्यातील युतीच्या सत्तेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे भागीदार आहेत. मात्र, कोणीही माघार घेतली नसल्याने या ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.
भाजपचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मुंबईला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. कदाचित अजित पवार आणि मोहोळ प्रत्येकी दोन वर्षांसाठी हे पद वाटून घेतील.

दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनी २०१७ ते २०२१ आणि २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी सादर करण्यात आलेला बदल अहवाल फेटाळला आहे. यानंतरही ही निवडणूक घेतली जात आहे. त्यानंतर नेमके काय होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अशातच मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर या भेटीत काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

