इतिहासच घडतोय! सुट्टी रद्द करुन हायकोर्ट उघडलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध तातडीची सुनावणी, नेमकं काय घडतंय?

मुंबई : सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज चौथा दिवस असून मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मुंबईत दाखल होत आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी हजारो गाड्या मुंबईत आणल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

असे असताना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाला आज सुट्टी असताना देखील सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. यामुळे हे पहिल्यांदाच घडत आहे.

एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सदर सुनावणी होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत केलं होतं.

यामध्ये आझाद मैदानात आंदोलनासाछी 5 हजार लोकांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाकडून कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत मराठा समाज आक्रमक झाला असून मुंबईत मोठ्या प्रमाणावर पोलीस यंत्रणा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणे यांचा वापर करता येणार नाही. आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे. आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही. अशा अनेक अटी ठेवण्यात आल्या होत्या.
