केरळमध्ये कोरोनाचा ‘हाय अलर्ट’; मास्क सक्ती….!
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये कोरोना केसेस वाढत चालल्याने राज्य सरकारकडून गर्भवती महिला तसेच व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जाॅर्ज यांनी याबाबत घोषणा केली आहे. वृद्ध आणि अंथरुणाला खिळलेल्या रूग्णांचे या आजारापासून संरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील कोविड-19 परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे होणारे मृत्यू बहुतेक 60 वर्षांवरील लोकांमध्ये आणि मधुमेहासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजार असलेल्या लोकांमध्ये नोंदवले जातात.
ओमिक्रॉन प्रकाराने सर्वाधिक लोक संक्रमित
आरोग्य विभागाने सर्व जिल्हा रुग्णालयांना योग्य कोविड-19 मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या असून कोरोनाच्या रुग्णांची वाढ लक्षात घेऊन सर्ज योजनेनुसार सुविधा वाढविण्याचे निर्देश दिले. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोविड-19 मुळे 85 टक्के मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मंत्र्यांनी ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले असून लवकरच खासगी रुग्णालयांची विशेष बैठक घेण्यात येईल असे सांगितले. ताज्या चाचणीनुसार, ओमिक्रॉन प्रकाराने सर्वाधिक लोक संक्रमित झाल्याचे आढळले आहेत.