राज्यभरात पाऊस जोरदार कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट? जाणून घ्या संपूर्ण यादी ..

पुणे : राज्यभरात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता असून या अवकाळी पावसाने विशेषतः नाशिक जिल्ह्यातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हा पाऊस महिनाअखेरपर्यंत, म्हणजेच ३० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, पुणे, अहिल्यानगर, पालघर, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये सोमवारी यलो अलर्ट असून, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांनाही सोमवारी यलो अलर्ट आहे. विदर्भात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, गडचिरोलीत मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे. या काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याच्या अंदाज आहे.
