राज्यभरात आजपासून धो-धो पाऊस कोसळणार! १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या..

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत ढगाळ वातावरण राहील आणि उकाडा कायम असला तरी तापमान 32-33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. विदर्भात अकोला, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेस वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटामुळे विजेच्या उपकरणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाड्यात बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पेरणी आणि पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यालाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात तापमान 30-31 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा. विजांच्या गडगडाटात घराबाहेर जाणं टाळा आणि शेतकऱ्यांनी पिकांचं रक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, असं प्रशासनाचं आवाहन आहे.