दिल्लीत मुसळधार पाऊस, पावसाने तोडले ‘एवढ्या’ वर्षांचे रेकॉर्ड, यलो अलर्ट जारी…

नवी दिल्ली : संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. काल राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.
त्याचबरोबर आजही उत्तर भारतातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमधील लोकांना पावसापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
तसेचह आज देखील मुसळधार पाऊसपडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने आजसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत काल मान्सूनच्या मोसमातील पहिल्या मुसळधार पावसाने २० वर्षांचा विक्रम मोडला. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय राजधानीच्या अनेक भागात पाणी साचले, झाडे उन्मळून पडली, वाहनांचे नुकसान झाले आणि वाहतूक कोंडी देखील झाली.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्राथमिक हवामान केंद्र असलेल्या सफदरजंग वेधशाळेने सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत १२६.१ मिलीमीटर (मिमी) पावसाची नोंद केली.
त्यांनी सांगितले की, पावसाचा हा आकडा १० जुलै २००३ नंतर सर्वाधिक असून त्यानंतर २४ तासांत १३३.४मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिल्लीत पावसामुळे तुंबलेले नाले आणि तुंबलेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पाणी साचल्यामुळे काही रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. अशा स्थितीत आजचा पाऊसही कालप्रमाणेच नागरिकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.