पुण्यात मुसळधार पावसाचा फटका, अनेक शाळांना सुट्टी जाहीर, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं…

पुणे : पुणे शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे. काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातील अनेक शाळांनी आज (१५ सप्टेंबर २०२५) सुट्टी जाहीर केली आहे.

हडपसर परिसरातील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील वाहतूक व्यवस्था मंदावली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, तसेच कोणताही अपघात टाळता यावा यासाठी शाळांनी हा निर्णय घेतला आहे.

पुणे महानगरपालिकेने आणि प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुढील काही तास शहरातील परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शाळांनी सुट्टी जाहीर केल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील ३ तासात अहिल्यानगर, बिड, पुणे, सोलापूर येथे काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे.
