सावधान! पुढील ४ दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी..

पुणे : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या चार दिवसांत (२८ मे ते ३१ मे २०२५) पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदा मान्सून नेहमीपेक्षा १०-१२ दिवस आधीच राज्यात दाखल झाला असून, अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील काही भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यांचा अनुभव येणार आहे.
विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा घाटमाथा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम – या २१ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये २८ मे रोजी ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. तर पुण्यात मध्यम पावसाची शक्यता असून, घाटमाथ्याच्या भागांमध्ये विशेष सतर्कतेची गरज आहे. राज्यातील सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वातावरणात झाडाखाली थांबणे टाळावे, सुरक्षित स्थळी निवारा घ्यावा. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.