महाराष्ट्रात ८ दिवस धुवांधार पावसाचा इशारा, वाचा पंजाबराव डख यांचा ताजा हवामान अंदाज..

पुणे : राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होत असून, १७ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत अतिशय महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच २५ मेपर्यंत राज्यभर अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अनुभव येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेषतः हा पाऊस सलग न पडता दोन-दोन दिवसांच्या अंतराने कोसळणार आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत राहणार आहेत.
त्यामुळेच पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांनी ३० मेपूर्वी आपल्या शेतजमिनी मशागतीसाठी तयार कराव्यात, कारण हा पाऊस एक फूटपर्यंत जमिनीत ओलावा निर्माण करू शकतो, जो खरिपाच्या पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान, डख यांच्या अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व भागांत या पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल. विशेषतः मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे.
यासोबतच विजांचा कडकडाट, गारपीट आणि ताशी ३०–६० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यांचा देखील काही ठिकाणी अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विजेपासून सावध राहणे, झाडांखाली उभे राहणे टाळणे आणि शक्यतो सुरक्षित स्थळी थांबणे गरजेचे आहे.
या हवामान बदलामागील मुख्य कारण म्हणजे हवामानातील द्रोणीय स्थिती. यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाने यासाठी यलो आणि काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २० ते २२ मे दरम्यान तळ कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून यावर्षी वेळेपूर्वी म्हणजेच 31 मेच्या आत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि हळूहळू संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचेल.
त्यामुळे सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असला तरी त्याचा परिणाम शेतीसाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहे. हा पाऊस खरिपाच्या हंगामासाठी आवश्यक असलेला ओलावा देणार असून, शेतकऱ्यांनी त्याचा योग्य वापर करून आपल्या शेतजमिनीची मशागत सुरुवातीपासूनच करून ठेवावी.
शेतकऱ्यांसाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक वर्षे दुष्काळ, अपुरा पाऊस किंवा अनियमित हवामानाचा फटका बसल्यानंतर यंदा पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतीसाठी चांगली सुरुवात मिळू शकते.