राज्यात गारपीट, पावसाचा तडाखा, काढणीला आलेली पिके जमीनदोस्त, शेतकरी संकटात…!

पुणे : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळीने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसासोबत गारपीटीनंही झोडपून काढलं आहे. यामुळे अगदी उद्याच काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहे.
सध्या कांदा, गहू, ज्वारी पिकांची काढणी सुरु असताना अचानक पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस, गारांमुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली. अजून दोन दिवस गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

२ हजार ६८५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका गव्हाला बसला असून १ हजार ८०३ हेक्टरवरील गहू पिकाचं नुकसान झालं आहे. तर ७७५ हेक्टर द्राक्षाचे आणि ६५ हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झाले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना सध्या बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच संकटात आले. यातच आता पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.