शेतकऱ्यांनो काळजी घ्या! महाराष्ट्रात ३ दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट, विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचे संकट..

पुणे : राज्यात पुन्हा एकदा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात कडाक्याचं ऊन पडत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट आहे. वेस्टर्न डिस्टरबन्सच्या एकामागून एक येणाऱ्या लाटांमुळे उत्तर भारतासह महाराष्ट्राच्या हवामानातही मोठा बदल होत आहे.

काही ठिकाणी आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे. तर १८ ते २० मार्च दरम्यान गारपीट आणि मुसळधार पाऊस असं दुहेरी संकट येणार आहे. सध्या हरियाणाच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं असून तिथून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
हा कमी दाबाचा पट्टा थेट दक्षिण भारतापर्यंत खाली सरकताना पाहायला मिळतो. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अचानक मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचं स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी सांगितलं.

या सगळ्याचा पहिला परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येईल. १८ मार्चच्या संध्याकाळपासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होऊ शकते. १९ आणि २० मार्चला या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढचे ३ दिवस महत्त्वाचे असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीदरम्यान ४० किमीपर्यंत सोसाट्याचा वारा वाहणार आहे. शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.