अज्ञात महिलेने घरात घुसून बाळाचा खून केल्याचा कांगावा ठरला खोटा ! बाळ वडिलांसारखे दिसते असे नातेवाईक सारखे बोलायचे म्हणून निर्दयी आईनेच केली पोटच्या चिमुकलीची हत्या…!
नाशिक : नाशिकमध्ये काल तीन महिन्याच्या मुलीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईनेच खुनाचा बनाव रचत आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचे गळा चिरून खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
नाशिक शहरातील गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती .या घटनेत अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करत मुलीचा गळा चिरला होता.मात्र या प्रकरणात आईनेच बनाव रचल्याचे समोर आले आहे.
बाळ वडिलांसारखे दिसते असे नातेवाईक सारखे बोलायचे. तसेच पति आणि सासूकडे बाळ जास्त खेळायचे, या कारणामुळे आई नैराश्यात होती. सोमवारी रात्री सासू आणि दिर घराबाहेर गेले असतांना आईने झोपलेल्या ध्रुवांशीचा सुरीने गळा कापला. त्यानंतर सूरी धुवून जागेवर ठेवून दिली. त्यानंतर एका महिलेने तोंडाला रुमाल लावत बेशुद्ध केले आणि बाळाचा खून केल्याचा बनाव आईने रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी आई युक्ता भूषण रोकडेला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, ध्रुवांशीच्या हत्येचा प्रसंग सांगताना युक्ता रोकडे हिने एका अज्ञात महिलेने तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केल्याचा बनाव रचला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ध्रुवनगर येथील घरात भूषण रोकडे यांना त्यांची भावजयी बेशुद्ध अवस्थेत तर ध्रुवांशी हिचा गळा कापलेल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.
याचदरम्यान , भूषण रोकडे यांनी युक्ताला उठविल्यानंतरच तिला ही घटना कळल्याचे तिने नातेवाइकांना सांगितले. त्यानुसार नातेवाइकांनी पोलिसांनाही तशीच माहिती दिली होती. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता त्यात युक्ताने केलेल्या वर्णनाची संशयित महिला परिसरात दिसून आली नाही. त्यामुळे मारेकरी शोधण्यासाठी पोलिसांनी सर्वच नातलंगांसह युक्त्ताचीही चौकशी सुरू केली. त्याच युक्ताच्या जबाबात ही तफावत आढळल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
नातेवाईकांच्या चौकशी दरम्यान जबाबात तफावत
संपूर्ण शहराला हादरून सोडणाऱ्या ध्रुवांशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्वच नातेवाईकांची कसून चौकशी केली असता युक्ता रोकडेसह नातेवाईकांच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळून आली. पोलिसांनी युक्ताला घडलेला प्रसंग वारंवार विचारून कसून चौकशी केल्याने अखेर तिनेच घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले.
बाळ वडिलांसारखे दिसते असे नातेवाईक सारखे बोलायचे म्हणून…
भूषण रोकडे याने युक्तासोबत दुसरा विवाह केला होता. त्यांना तीन महिन्यापूर्वी ध्रुवांशी झाली होती. मात्र तिचे सासू, सासरे, दीर यांच्याकडून सातत्याने मुलगी भूषण रोकडे यांच्या सारखी दिसते, त्यांचेच अनुकरण करते. युक्ताचे अनुकरण करत नाही, हेच चांगलं असल्याचं बोलून युक्ताला त्रास देत असल्याने पोटच्या ध्रुवांशीविषयी युक्ताच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातूनच तिने चिमुकलीचा गळा चिरल्याची घटना समोर आली आहे.