शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख अखेर ठरली!! निर्णयाकडे महाराष्ट्राचे लागले लक्ष…


मुंबई : १४ जुलै रोजी न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात या सुनावणीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरु आहे. या निर्णयावर सगळं गणित अवलंबून आहे.

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आता १४ जुलैला सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील राजकीय दिशा ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे यावर दोन्ही पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर येत्या १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सुनावणी घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालय काय भूमिका घेते, ठाकरे गटाला दिलासा मिळतो का? हे समजणार आहे.

याचिकेवर न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. या महत्त्वाच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेतला आहे. राष्ट्रवादी प्रकरणात न्यायालयाने अजित पवार गटाला तात्पुरते चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती.

अजितदादा पवार यांना हे चिन्ह तात्पुरते आहे आणि अंतिम निकालाच्या अधीन आहे, असा निकाल दिला होता. ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की, राष्ट्रवादीप्रमाणेच तात्पुरते आदेश एकनाथ शिंदे गटाला देण्यात यावेत आणि अंतिम निकाल होईपर्यंत स्पष्ट मर्यादा घालण्यात याव्यात. महापालिका निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सुनावणी निर्णायक ठरू शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!