रमी गेमच खेळत होते, आता स्पष्टच दिसतंय!! माणिकराव कोकाटेंचे आणखी दोन व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी आणले समोर…

मुंबई : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असे असताना अजून दोन व्हिडिओ समोर आले आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडीओ समोर आणले आहेत. यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेले आहेत. यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
माणिकराव कोकाटे यांनी मी युट्युब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो, असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या विडिओमध्ये सगळं उघडपणे दिसून येत आहे. यामुळे सध्या कोकाटे यांनी केलेला दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अजित पवार यांच्यावर दबाव वाढत आहे.

याबाबत आव्हाड म्हणाले, कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते, याबाबत दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत आणि यामध्ये कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल, असे त्यांनी म्हटले आहे. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत.
आणखी किती पुरावे हवेत ते सांगा, मागाल तेवढे पुरावे देतो, असे आव्हान देखील आव्हाड यांनी दिले आहे. यामुळे आता शेतकरी संघटना देखील त्यांच्या राजीनाम्यावर आक्रमक झाल्या असून याबाबत आता कोकाटे राजीनामा देणार का? हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.