१६ वर्षाचा असताना १८ वर्ष दाखवून दस्त केला रजिस्टर! पुण्यात आर्थिक फायद्यासाठी फसवणुक केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुण्यातील मुंढवा येथे जमिन खरेदी करताना आर्थिक फायद्यासाठी वय जास्त दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विमुक्त भटक्या जमातीकरीता मुंढवा येथे देण्यात आलेल्या जमिनीबाबत खरेदी खत करताना भोगवटादाराचे वय १६ वर्ष ६ महिने असताना ते १८ वर्षाच्या दाखविले.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी जादा वय दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गृहसंस्थेच्या चेअरमनसह दोघांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, १९८९ साली विमुक्त भटक्या जमातीकरीता सरकराकडून मुंढवा येथे ७० कुटुुंबांना जमिनीचे वाटप करण्यात आले होते. यातीलच एक कुटुंब म्हणजे गायकवाड कुटुंब. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देणारे शशिकांत गायकवाड यांनी आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे.
जमिनीबाबत खरेदी खत करताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी माझं वय १६ वर्ष असताना १८ वर्ष इतके दाखवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १९८९ मध्ये विमुक्त भटक्या जमातीकरीता जमिनीचे वाटप करण्यात आले त्यात शशिकांत गायकवाड ज्यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची आजी मल्लावा यमणाप्पा गायकवाड यांना देखील ७९ आर क्षेत्राचे वाटप करण्यात आले होते. पुढे जाऊन शरद सहकारी गृहरचना संस्थेचे प्रवर्तक प्रमोद धाडीवाल यांना अकर्षिक प्रयोजनासाठी विक्री करण्यास अटी शर्तीवर परवानगी देण्यात आली होती.
याबाबतचे खरेदीखत १३ भोगवटादार आणि शरद सहकारी गृहरचना संस्थेचे प्रमोद धाडीवाल व रमेश धाडीवाल यांच्यात करण्यात आला. त्यात शशिकांत गायकवाड यांचेही नाव होते. ३ जानेवारी २००८ रोजी शशिकांत गायकवाड यांचे वय १६ वर्षे ६ महिने १५ दिवस होते. असे असताना या खरेदी खतात त्यांचे वय १८ वर्षे दाखविण्यात आले आहे. या मिळकतीची तेव्हा २ कोटी रुपयांना विक्री करण्यात आली होती. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यातून मोबदला देण्यात आला. परंतु, आपल्याला कोणताही मोबदला मिळाला नाही, असा गायकवाड यांचा दावा आहे.
दरम्यान, २०२२ साली गायकवाड यांना जुन्या कपाटात हे खरेदीखत सापडले. त्याची नोंदणी करताना त्यात त्यांचे वय १८ दाखविण्यात आले होते. त्यांनी पडताळणी केल्यानंतर हे तत्कालीन चेअरमन प्रमोद धाडीवाल व सेक्रेटरी रमेश धाडीवाल यांनी आर्थिक फायद्यासाठी वयाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास पुढील तपस करीत आहेत. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वय जास्त दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गृहसंस्थेच्या चेअरमनसह दोघांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रमोद धाडीवाल आणि रमेश धाडीवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.