Haveli : हवेली तालुक्यातील भावडी गावातील सुपूत्राने घेतला महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार! अमोल जाधव यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागाला मिळणार सांस्कृतिक व्यासपीठाचे प्रोत्साहन…
Haveli पुणे : भावडी (ता.हवेली ) येथील सुपूत्राची महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी अमोल जाधव यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे भावडी ग्रामस्थांनी सुपूत्राचा कामगिरीचे समाधान मानले आहे.
अमोल जाधव यांचे मूळ गाव हवेली तालुक्यातील भावडी येथे असून व्यावसायानिमित्त ते मुंबईला स्थायिक आहेत. त्यांनी मुंबई येथे निवासी असताना त्यांनी मूळ गाव भावडीच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यांनी विविध योजनांतून गावाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे भावडी करांना या सुपूत्राचा नवीन संधीचा अभिमान आहे.
दरम्यान पदग्रहणावेळी अमोल जाधव म्हणाले की, मनोरंजन क्षेत्रात होणारे बदल समजून घेत महामंडळाने वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. नुकतेच केंद्र शासनाने मराठीला अभिजात दर्जा दिला आहे. आपले महामंडळदेखील भाषा,कला, साहित्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत असल्याने दर्जेदार कार्यक्रम राबविण्यावर आगामी काळात प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले. Haveli
पुढे विस्ताराने सांगतांना अमोल जाधव म्हणाले की, चित्रनगरीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा निर्माण करून आगामी काळात आशिया खंडातील सर्वोत्तम चित्रनगरी म्हणून दादासाहेब फाळके चित्रनगरी उदयास येईल यासाठी प्रयत्न करून आर्थिकवृद्धी होईल यासाठी चित्रीकरण वाढविण्यावर भर द्यायला हवे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान जाधव यांनी चित्रनगरी परिसराची भ्रमंती करुन परिसराची माहिती जाणून घेतली. अमोल जाधव हे महाराष्ट्र राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.