हवेली बाजार समितीत राष्ट्रवादी कडून उर्वरीत ५ जागा जाहीर ! बरखास्त संचालक मंडळातील कुटूंबियांना संधी !!

उरुळी कांचन : हवेली कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने उर्वरीत ५ जागांसाठी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारांत माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचन यांच्या पत्नी प्रतिभा कांचन, बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गोते यांचे चिरंजीव संदिप गोते व माजी संचालक अलका चरवड यांचे चिरंजीव कुलदीप चरवड यांना पक्षाने संधी दिल्याने उमेदवारी कोटा राष्ट्रवादी ने पूर्ण केला आहे.
हवेली बाजार समितीच्या १९ वर्षानंतर होत असलेल्या निवडणूकीस राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीसाठी मतदानाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवाराचा घोळ मिटत नसल्याने राष्ट्रवादी ने १० उमेदवारांचा पॅनेल जाहीर केला होता.
परंतु उर्वरीत ५ ठिकाणी उमेदवारांत एकमत होत नसल्याने उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाला होता. सेवा सहकारी संस्था गटात 3 जागा व महिला सहकारी संस्था प्रतिनिधी गट व ग्रामपंचायत अणुसूचित गटात १ जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाला मोठी काथ्याकूट करावी लागत होती.
अखेर पक्षाने महिला प्रतिनिधी गटात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन यांच्या पत्नी प्रतिभा कांचन यांना, तर बाजार समितीचे माजी सभापती माणिकराव गोते यांचे
चिरंजीव संदिप गोते, माजी संचालिक अलका चरवड यांचे चिरंजीव कुलदीप तर दत्तात्रय चोरघे यांना संधी दिली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी ने २००२ साली बरखास्त संचालक मंडळातील माजी संचालक प्रकाश म्हस्के यांचे बंधू शेखर म्हस्के , संचालक बाबुराव चांदेरे यांच्या पत्नी सरला चांदेरे, यशवंत चे तत्कालीन संचालक राहुल काळभोर यांना संधी दिल्याने विरोधकांना आता टिका करण्याची संधी मिळाली असून तत्कालीन संस्था बरखास्त झालेल्या संचालक मंडळातील कुटूंबियांना संधी मिळाल्याने फक्त निवडून येण्याचा निकष पक्षाने पाहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.