Haveli : पूर्व हवेली तालुक्याच्या रचनात्मक विकासाचा रोडमॅप आवश्यक! राज्य सरकारने धोरण ठरवण्याची गरज! विधानसभेसाठी जनतेला अपेक्षित उत्तरे हवीत…

जयदीप जाधव
Haveli उरुळीकांचन : आगामी विधानसभेची निवडणुक ही पूर्व हवेली तालुक्याच्या जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार असून पुढील काळात पूर्व हवेली तालुक्याचा सर्वसामावेशक विकास घडावा म्हणून हवेली तालुक्यातील विकासाचा एक रोडमॅप करण्यासाठी एक नियोजनबध्द विकासाची संकल्पना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पुणे शहराच्या विस्ताराच्या कक्षा पूर्व हवेली वगळता आता संपल्याने भविष्यात विकासाचा ध्यास ठेऊन या भागात सुनियोजित शहर वसविण्यासाठी विकास आराखडा ही संकल्पना पूर्व भागात राबविणे क्रमप्राप्त झाले आहे.
मुंबई,ठाणे या महापालिकांचा बेसुमार विस्तार झाल्यानंतर शहरीकरण झालेल्या भागात नवी मुंबई ,कल्याण -डोंबिवली व मिराभाईंदर महापालिकांची निर्मिती करण्याची गरज भासली आहे. तशीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेची होत असून पुणे महानगर पालिकेची विस्ताराची मर्यादा संपली आहे. पुणे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ हे६०३चौरस किलोमीटर या प्रमाणात वाढले आहे. तसेच पालिकेलानवीन सामाविष्ठ झालेल्या ३२ गावांतील विकास आराखडा राबविताना दमछाक होत आहे.पालिकेची लोकसंख्या ५०लाखांवर गेली असल्याने नागरी सुविधा देताना मर्यादा आल्या आहेत.
अशीच परिस्थिती आता पूर्व हवेलीत झाली असून बकालपणा व सुनियोजित शहर वसविण्यासाठी नियोजित आराखडा नसल्याने या भागात बोडकेपणा वाढू लागला आहे. अनधिकृत बांधकामांनी या भागात पंख पसरले असून भागाची लया जावू लागली आहे. अतिक्रमणे , सांडपाणी, उघड्यावर फैलणारा कचरा व नैसर्गिक संपत्तीची मोठी हाणी परिसरात सुरू आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे पुणे शहराची पूर्व हवेलीत व्याप्ती वाढताना भविष्यात या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. Haveli
पूर्व हवेलीत पुणे-नगर रस्त्यावरील गावे तर पुणे – सोलापूर रस्त्यांवरील गावे या शहरीकरणामुळे प्रचंड फोफावू लागली आहे. या गावांचा गावपणाचा आकार संपू लागला असून अनधिकृतपणे वाढणारे प्लॉटींग व भविष्यात वाढत असलेल्या गृह प्रकल्पांनी या भागाचा ग्रामपंचायत स्तरावर विकास करणे आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. तर पायाभूत निधीअभावी घनकचरा, सांडपाणी तसेच मलनिस्सारण हे मोठे प्रश्न निर्माण होऊ लागल्याने महापालिका स्तरावर या भागात नियोजन पूर्व काम झाले नाही तर भविष्यात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
पूर्व हवेलीत एमएससीआरडीसीचा प्रस्तावित रींग रोडसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला आहे.तसेच या भागातून पीएमआर डीए चा प्रस्तावित रींग रोडसाठी विकास आराखड्यात सामावेश आहे. त्यामुळे भविष्यात पूर्व हवेलीत भव्य टाऊनशिप उभारण्यास या भागात वाव असल्याने नियोजनबद्ध विकास आराखड्याची या ठिकाणी गरज निर्माण झाली आहे. या भागात वाहतुकीचाही मोठा प्रश्न भेडसावत असून मेट्रोसहीत प्रस्तावित एलिव्हेटेड उड्डाणपूल उभारण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. या भागात उरुळीकांचन या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वेचे ट्रान्सपोर्टेशन स्टेशन घोषणा झाली असली तर लवकरच प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी अस्तित्वात येणाऱ्या राज्य सरकारकडून हे धोरण निश्चित ठरवावे ही अपेक्षा असणार आहे.
हवेलीकरांना आता लोकप्रतिनिधी हवाच..!!
पूर्व हवेलीकरांना विकासाच्या वाटा भक्कम करण्यासाठी व आपले भविष्याचे नियोजनाचे उदिष्ट गाठण्यासाठी आता आपला हक्काचा लोकप्रतिनिधी असणे अतिशय महत्वाचे बनले आहे. कारण या डोंगराएवढ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आपल्या भागातील असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी असेल तर या गोष्टींना राज्य शासन स्तरावर दंबावतंत्र वापरुन सोडवून घेणे शक्य आहे. नाहीतर आपला आवाज कितीपत ऐकला जाईल हे प्रश्नचिन्ह आहे.