शाळेत द्वेषाचे धडे! भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभे केले आणि सर्व विद्यार्थ्यांना…., धक्कादायक घटनेची देशात चर्चा..
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले.
तसेच मुस्लीम धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचेही समोर आले आहे. हा संतापजनक प्रकार गुरुवारी (ता. २४) मनसुरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुब्बारपूर गावातील शाळेत घडला.
विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आरोपी शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांविषयी द्वेष निर्माण करताना दिसत आहे.
आरोपी शिक्षिकेचं नाव त्रिप्ता त्यागी असे आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावे.
शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या तोंडावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असे काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुले उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.
यानंतर शिक्षिका म्हणाली की, चला मारण्याचे आणखी कोण बाकी आहे. आता पाठिवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचे लाल होत आहे. त्यामुळे तोंडावर मारू नका. सर्वांनी पाठिवर मारा.
पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग आरोपी शिक्षिका आणि तिच्या मालकीच्या नेहा पब्लिक स्कुल या शाळेविरोधात कारवाईबाबत चाचपणी करत आहे.