Harshvardhan Patil : साखर कारखानदारीला येणार चांगले दिवस, साखरेला प्रतिकिलो 42 रुपयांचा हमीभाव मिळणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिली महत्वाची माहिती…

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांची नुकतीच राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर या संदर्भात सातत्याने हर्षवर्धन पाटील हे पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले, तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
साखरेची कारखाना स्तरावरील किमान विक्री किंमत ही ३१ रुपयावरून ४२ रुपये झाली पाहिजे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशील असलेल्या राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शिष्टाईला यश येण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन शहा यांनी दिले असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षात उसाची एफ आर पी वाढली, मात्र साखरेची किमान विक्री किंमत केंद्र सरकारने यापूर्वी ठरवल्यानुसारच ३१ रूपये राहिली. त्यामुळे साखर कारखान्यांपुढे फार मोठा प्रश्न सातत्याने निर्माण होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांना मोठी तफावत भोगावी लागत असून कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे साखर उद्योगासाठी आता साखरेची किमान विक्री किंमत ४२ रुपये प्रति किलो असली पाहिजे अशी मागणी देशातील सर्व साखर कारखान्यांनी केली आहे. या मागणीसाठी हर्षवर्धन पाटील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
यासंदर्भात नुकतीच हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत चर्चा केली, तेव्हा शहा यांनी हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे या पुढील काळात मांडला जाईल असे आश्वासन दिले आहे.