कर्कश्आवाज, काळ्या नंबर प्लेट पडणार महाग ! पुणे पोलिसांकडून सुरू झाली कारवाई…!
पुणे : शहरातील काही वाहनांच्या नंबरप्लेटवरील क्रमांकामध्ये त्यावर ‘आमदार’, ‘खासदार’, ‘नाना’, ‘दादा’, ‘भाई’, ‘पोलिस’, ‘प्रेस’, ‘आर्मी’ असे शब्द लिहिणे असणाऱ्या वाहन चालकांना आता पुणे शहर पोलिसांनी दणका दिला आहे.तसेच सायलेन्समध्ये छेडछाड करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या धूमस्टाइल दुचाकीस्वारांवरही पोलिसांची करडी नजर ठेवली आहे.पुणे शहर पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे कारवाई केली जात आहे. परंतु आपल्या वाहनांचा क्रमांक सहज ओळखला जाऊ नये, यासाठी काही जण नंबरप्लेटवरील क्रमांकामध्ये छेडछाड करतात. मात्र, हे वाहतूक नियमाचे उल्लंघन आहे.
पुणे शहर वाहतूक पोलिसांनी फॅन्सी नंबरप्लेटच्या विरोधात मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या चार हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या वाहनचालकांकडून ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे.
शहरात सुरक्षिततेच्या दृष्टीने मोटारींना गडद काळ्या फिल्म लावण्यास बंदी आहे. विशेषत: जयंती, सण आणि उत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. गडद काळ्या फिल्म लावणाऱ्या तीन हजार वाहनचालकांना सुमारे ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.
शहरात काही अतिउत्साही तरुण दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून रात्री सोसायट्यांच्या परिसरात कर्कश आवाज करत असतात. त्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. विशिष्ट कंपनीच्या दुचाकीच्या कॉइलमध्ये मेकॅनिककडून सेटिंग करून घेतले जाते. दुचाकी बंद-चालू करण्याचे बटन दाबल्यास सायलेन्सरमधून फायरिंग केल्यासारखा विचित्र आवाज येतो.
त्यामुळे त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.याबाबत पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा अडीच हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २६ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.