लोणी काळभोर येथे अर्धा किलो गांजा जप्त, महिला तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

लोणी काळभोर : सार्वजनिक रस्त्यावर खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच तिच्याकडून ११ हजार रुपये किंमतीचा ५५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक-2 च्या पोलिसांनी ही कारवाई लोणी काळभोर (ता.हवेली) गावात गुरुवारी (ता.१५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केली आहे.
मंगल संतोष भाले (वय. ४०, रा गारूडी वस्ती, लोणी कळभोर, हवेली) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार रविन्द्र रघुनाथ रोकडे यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तस्कारांसह अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने लोणी काळभोर पोलीस व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ हे संयुक्तरीत्या लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना लोणी गावात एक महिला स्वत:जवळ गांजा बाळगून विक्री करीत आहेत. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी महिला मंगल भाले ही बेकायदेशिररित्या गांजा विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून ११ हजार रुपये किंमतीचा सुमारे ५५० ग्रॅम गजा जप्त करण्यात आला आहे.
तिच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा, १९८५ प्रमाणे कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, महिला पोलीस हवालदार राणी खामकर, रविन्द्र रोकडे, पोलीस अंमलदार प्रदीप गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.