बंदुकीचा धाक, सावकारी प्रकरण, त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने केले विष प्राशन, उरुळी कांचनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल…

उरुळी कांचन : सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळामुळे एका तरुण व्यावसायिकाने विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे.

या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंता पवार, माऊली पवार, रा. हडपसर), दिपाली साळुंखे रा. कुंजीरवाडी) व विजय पांडुरंग गोते रा. उरुळी कांचन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकणी महादेव विठ्ठल जरांडे (वय ३६, व्यवसाय जुने चारचाकी वाहन खरेदी-विक्री, रा. उरुळी कांचन परिसर) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आनंता पवार व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या रकमा दिल्या. मात्र, त्यावर दरमहा ८ ते १० टक्के इतक्या अवाजवी व्याजदराने वसुली करण्यात आली.
त्यानंतर ५३ लाख ८९ हजार रुपये मुद्दल घेतल्यानंतरही आरोपींनी अवघ्या ११ महिन्यांत ६० लाख ४१ हजार रुपये व्याज वसूल केल्याचा आरोप आहे. तसेच, व्याज न दिल्यास दबाव टाकत विक्रीसाठी ठेवलेल्या १२ जुन्या चारचाकी गाड्या ओढून नेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये आरोपींनी तक्रारदारास मारहाण करून जबरदस्तीने कुंजीरवाडी येथे नेले. तेथे बंदुकीचा धाक दाखवून, कोरेगाव मूळ येथील ३ गुंठे जमीन साठेखत व कायमस्वरूपी कुलमुखत्यारपत्राद्वारे आरोपींच्या नातेवाईकाच्या नावावर करून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या व्यवहारात कोणताही धनादेश प्रत्यक्षात देण्यात आलेला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सततच्या छळामुळे तक्रारदाराने २६ जानेवारी २०२६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार घडला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, शुद्धीत असताना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
