‘लाडकी बहीण ‘योजनेच्या दोन हप्त्यांना ग्रीन सिग्नल ; कधी येणार खात्यावर ?

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याच्या वितरणाबाबत हालचालींना वेग आला आहे. या योजनेतील महिला लाभार्थ्यांना दोन महिन्यांचा हफ्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा ठरला.‘लाडकी बहीण’ योजना ही आधीपासून सुरू असल्याने निवडणूक आचारसंहितेमुळे अनुदान वितरणावर कोणताही प्रतिबंध येत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान लाभार्थी महिलांच्या अनुदान वितरणाबाबत अद्याप राज्य सरकारकडून आयोगाकडे कोणतीही विचारणा झालेली नाही. मात्र, या योजनेच्या हप्त्याच्या वितरणाशी आचारसंहितेचा काहीही संबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांनी स्पष्ट करत लाडक्या बहिणींना ग्रीन सिग्नल दिला आहे.

लाडक्या बहिणीचे आता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले असताना आता माहितीनुसार, महापालिकांच्या मतदानाच्या दोन ते चार दिवस आधी हा एकत्रित हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक काळातच या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, या योजनेतील सुमारे २ कोटी ४२ लाख लाभार्थ्यांपैकी केवळ १ कोटी ६० लाख महिलांनीच केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने केवायसी अनिवार्य केली असून, काही ठिकाणी शासकीय कर्मचारी तसेच पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. त्यावर सरकार कारवाई देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
