कौतुकास्पद ! जिल्ह्यात वर्षभरात रेशीम कोषाचे २ लाख किलोपेक्षा अधिक वार्षिक उत्पादन…!
पुणे : जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षात तुती लागवडीसाठी देण्यात आलेल्या २५० एकर लक्षांकापैकी २४१ एकर क्षेत्रावर २२६ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केली असून चालू वर्षात ३ लाख ९ हजार ४०० अंडीपुंजाच्या कीटक संगोपनापासून २ लाख १८ हजार ४१४ किलोग्राम कोषांचे उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अंडीपुंज संख्या ३३ हजार ८२५ संख्येने जास्त असून कोष उत्पादन ४० हजार ५९९ किलोग्रामने वाढले असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंडीपुंजाच्या अनुदानापोटी १३ लाख ३३ हजार ९१३ रुपये मंजूर झाले असून लाभार्थ्यांना रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७५ अल्पभूधाक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. ही योजना ३ वर्षाच्या कालावधीसाठी असून विभागून एकरी रुपये ३ लाख ४२ हजार ९०० रूपये अनुदान देण्यात येते.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृषि उत्पन्न बाजार समिती बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समिती व रेशीम संचालनालय यांचे समन्वयाने ईनाम पद्धतीने कोषांची खरेदी करण्यास सुरूवात झाली असून ५१ हजार ६२६ किलोग्राम कोषांची खरेदी या बाजारात झाली आहे. याची किंमत २ कोटी ९६ लाख ९६ हजार ४९० रुपये आहे. भारतात ई-नाम पद्धतीने कोषांची खरेदी करणारा पुणे हा पहिलाच जिल्हा आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर कोष परीक्षण अहवाल तयार करुन त्याच्या सहाय्याने ऑनलाईन लिलाव प्रक्रिया अवलंबिली जाते.
जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समिती बारामती येथे शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टिने रॉ सिल्क सेंटरसाठी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून यंत्र उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
खेड तालुक्यातील मौजे दौंदे येथे खासगी स्तरावर बाल किटक संगोपन केंद्र (चॉकी) असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ अवस्था पूर्ण झालेले रेशीम किटकांचा (अळ्यांचा) पूरवठा केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोष उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच वार्षिक रेशीम पिकांची संख्या वाढण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रेशीम अळ्यावरती येणाऱ्या रोगामुळे होणारे नुकसानीस आळा बसला आहे. जिल्ह्याबाहेरुनदेखील शेतकरी बाल किटक संगोपन केंद्रातून अळ्या खरेदी करतात. पुणे जिल्ह्यात चालू वर्षी १ लाख ६७ हजार २०० अंडी पुज्यांची चॉकी वाटप करण्यात आली आहे.
शासनाने सन २०२३-२४ साठी २५० एकर तुती लागवडीचे लक्षांक दिलेला आहे. आजअखेर ८४० शेतकऱ्यांनी ८४९ एकर क्षेत्राकरीता नाव नोंदणी केली आहे. चालू वर्षापासून सिल्क समग्र-२ योजनेतून शेतकऱ्यांकरीता तुती लागवड, किटक संगोपन गृह बांधणी, रेशीम धागा निर्मिती करता आणि बाल किटक संगोपन केंद्र उभारणी याकरता अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे.
सिल्क समग्र-१ योजनेअंतर्गत किटक संगोपन गृह उभारणीकरीता ५ शेतकऱ्यांना रुपये ६ लाख ३२ हजार ३९५ रुपयांचे अनुदान व किसान नर्सरीकरीता १ लाख ३५ हजार अनुदान मंजूर झाले असून त्याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती येथे रेशीम कोष बाजारपेठ तथा कोषपश्चात प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी तसेच चांगले रीलर्स व विव्हर्स तयार व्हावेत या उद्देशाने ‘रेशीम विकास कार्यक्रम पायाभूत सुविधा निर्मिती व अस्तित्वातील बळकटीकरण करण्यासाठी योजना’ अंतर्गत शासनाने ९ कोटी ५६लाख ६२ हजार रुपये मंजूर केलेले आहेत. या प्रकल्पातून रेशीम कोष बाजारपेठ, कोषोत्तर प्रक्रिया विभागांचे जसे की रीलींग, ट्वि स्टिंग, डाईंग,विव्हींग इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यामुळे राज्यात कुशल उद्योजक व कुशल कामगार तयार होण्यास फायदा होणार आहे.