Gram Panchayat Election 2023 : दौंडमध्ये राहुल कुल यांचे वर्चस्व, अन् थोरात गटाला धक्का!! तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा निकाल आला हाती…
Gram Panchayat Election 2023 : राज्यात आज अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल कुल गटाची सरशी झाल्याचे दिसून येत आहे.
याठिकाणी आज दहा ग्रामपंचायतींसाठी दौंड येथील तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली होती. यामध्ये दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे आणि नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. Gram Panchayat Election 2023
दौंड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. ६) नवीन प्रशासकीय इमारत तथा दौंड तहसील कार्यालयात पार पडली. ११ पैकी वाटलूज ही एक ग्रामपंचायत बिनविरोध निवड झाल्याने उर्वरित १० ग्रामपंचायतची मतमोजणीस दौंड तालुका निवडणूक निर्णय अधिकारी तथा दौंड तहसीलदार अरुण शेलार व निवासी नायब तहसीलदार ममता भंडारे- देशमुख यांनी सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात केली.
ही मतमोजणी सुरु झाल्यानंर निवडणुकीत अनेक ठिकाणी सरपंच पदाच्या व सदस्यांची चुरस पाहायला मिळाली. दौंड तालुक्यातील मलठण ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार पारूबाई परदेशी यांनी प्रस्थापित उमेदवारांना धूळ चारत मोठ्या फरकाने विजय मिळवला.
परदेशी यांनी विजयानंतर आमदार कुल गटाला पाठिंबा दिला, तर केडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या उमेदवार पुनम बारवकर यांनी ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवत आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.
याठिकाणी ओबीसी विरूद्ध मराठा अशी टक्कर झाल्याचे पहावयास मिळाले. पारगाव ग्रामपंचायतीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे माजी आमदार रमेश थोरात समर्थक सुभाष बोत्रे यांनी मतांची जोरदार आघाडी घेत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर कब्जा केला. या ठिकाणी आमदार राहुल कुल गटाचे समर्थक माऊली ताकवणे यांचा पराभव केला.
विजयी उमदेवार पुढील प्रमाणे..
सरपंच पदाच्या विजयी उमदेवार केडगाव ग्रामपंचायत – पुनम बारवकर ( अपक्ष ), पारगाव – सुभाष बोत्रे (राष्ट्रवादी अजित पवार गट ), कुरकुंभ – केशव खंडाळे (अपक्ष), पांढरेवाडी – नीता कोंडे (भाजप), वडगाव बांडे – सुभाष कुलाल (भाजप) , पानवली- प्रज्ञा भांड (भाजप), खोपडी – वैशाली गरदडे (भाजप), वाखारी – काळूराम केंजळे, (भाजप), मलठण – पारुबाई पदेशी (भाजप ), नायगाव – शोभा सोनवणे (भाजप ), वाटलुज – माया शेंडगे (भाजप ) बिनविरोध.
दरम्यान, आमदार राहुल कुल यांनी तालुक्यावर पुन्हा एकदा भाजपचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे. अशी चर्चा दौंड तालुक्यातील मतदारांमध्ये आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याचे देखील समोर आले आहे.