सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! १० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी जीआर निघाला…

पुणे : सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून 26 डिसेंबर 2025 रोजी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जीआर जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दीर्घकाळापासून सेवा नियमितीकरणाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
विशेषतः राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या जीआरचा मोठा फायदा होणार आहे. शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत समावेशनाबाबत मार्च 2024 मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्या निर्णयाच्या अनुषंगाने आता 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या वाहनचालक कर्मचाऱ्यांच्या सेवांचे सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहनचालक पदावर समायोजन आणि नियमितीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे दीर्घकाळ कंत्राटी स्वरूपात सेवा देणाऱ्या वाहनचालक कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी स्थान मिळणार आहे. यामुळे त्यांना सेवा सुरक्षेसह विविध शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या नव्या शासन निर्णयानुसार डिसेंबर 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक पाचमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार, 10 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा समावेशन झाल्यानंतर त्यांचे वेतन हे त्यांच्या लगतच्या मागील महिन्यांत मिळालेल्या मानधनाइतक्या नियमित वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ही वेतन निश्चिती संबंधित कार्यालय प्रमुखांच्या मान्यतेनंतर लागू केली जाणार आहे. तसेच या निर्णयानुसार 18 सप्टेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील परिच्छेद क्रमांक दोनमधील आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे वेतन आणि सेवा अटींबाबतची संभ्रमावस्था दूर झाली आहे.
