सरकारचा लाडक्या बहिणींना झटका; वयोमर्यादा ओलांडून योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा पत्ता कट…

पुणे : गेल्या वर्षी 2024 मध्ये मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली होती. या योजनेतून आतापर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्टपर्यंतचे पैसे खात्यात जमा झाले आहेत. मात्र काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळेल असे स्पष्ट असतानाही काही कुटुंबांतील तिघी चौघी जणींनी नोंदणी केल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता सरकारने लाडक्या बहिणींना झटका देत त्यांचा पत्ता कट केला आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून दरमहा महिलांना पंधराशे रुपये दिले जातात. या योजनेच्या अर्जांचीं पडताळणी सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटाची अट असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याचे पडताळणीत आढळले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 4 हजार 827 लाडक्या बहिणींचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू झाल्याने लाभाचे नियम, अटींकडे फारसे लक्ष केंद्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही महिलांनी कुटुंबांत चारचाकी असणे, संगांयो, इंगांयो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असतानाही नोंदणी केल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय, काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २३१ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७२ प्रस्ताव अपात्र ठरले.सध्या लातुर जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ४५९ लाभार्थी महिला आहेत. शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात १६१६ महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून ५५ हजार ०९२ महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत. लाडक्या बहिणींना सरकारने दणका दिला आहे.
