सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, राज्यपालांचे निवासस्थान आता ‘लोकभवन’ म्हणून ओळखले जाणार

पुणे : केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचे नावही बदलण्यात आलं आहे. राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे बदलण्यात आले आहे. उत्तराखंड, पश्चिम बंगाल,त्रिपुरा, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या राज्याच्या राज्यपालाने आधीच हा बदल सुरू केला आहे. आता महाराष्ट्रात देखील त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे.

राजभवनच्या सचिवांच्या नावाने एक अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामध्ये राजभवनचे नाव लोकभवन असे करण्यात आल्याचा आदेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी वास्तव्य करतात. राज्यातील राज्यापालांच्या आदेशाने आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर राजभवनचे नाव बदलण्यात आलं आहे. यापुढे राजभवन हे लोकभवन या नवीन नावाने ओळखलं जाईल असं या आदेशात म्हटलं आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून सेवा तीर्थ असे ठेवले आहे. लवकरच पीएमओ नवीन कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित होणार असून त्या इमारतीलाच सेवा तीर्थ हे नाव देण्यात आले आहे. नव्या परिसराला आधी सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत
एग्जिक्युटिव्ह एन्क्लेव्ह म्हणून ओळखले जात होते.यामध्ये पीएम ओ व्यतिरिक्त कॅबिनेट सचिवालय, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सचिवालय आणि इंडिया हाऊसची कार्यालये असतील. इंडिया हाऊस ही परदेशी उच्चस्तरीय प्रतिनिधींशी चर्चेसाठी तयार करण्यात आलेली विशेष जागा असेल. सेवा तीर्थ हे वर्कप्लेस सेवा, राष्ट्रीय ध्येय आणि जबाबदारीचे प्रतीक म्हणून डिझाइन करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर शासकीय इमारतींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे फक्त नामांतर नसून सार्वजनिक पदांची भावना पुनर्परिभाषित करण्याचा मोठा उपक्रम आहे.