Gopichand Padalkar : जसा बाप तशी लेक, शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ; गोपीचंद पडळकर सुप्रिया सुळेंवर संतापले, नेमकं घडलं काय?

Gopichand Padalkar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. ‘शिंदेंसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नही’, अशी टॅगलाईन देत सुप्रिया सुळेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक होण्याची आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्यांनी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याच्या सूचना समोर आल्या आहे.

‘शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही’, असा नाराच सुप्रिया सुळे यांनी बैठकीत दिला. आपलं टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस असतील. मुख्यमंत्र्यांवर आपण टीका करायची नाही. सरकारवर टीका करताना फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, असे त्यांनी म्हंटले. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जसा बाप तशी लेक म्हणत शरद पवार जातीयवादाचं विदयापीठ, असं म्हंटले आहे. Gopichand Padalkar
जरांगे, शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे, या लोकांचे राजकारण महाराष्ट्रातील लोकांना समजलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोललं पाहिजे. कारण त्यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातोय असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसं टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय, तो हल्ला करून घेण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचे, काही पत्रकारांना हाताशी धरायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची.
स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचे आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असं विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात जे जातीवादाचं विष पेरलं जातंय त्याकडे जनता सुज्ञपणाने बघतेय. पवारांचा फॉर्म्युला आहे, पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या. फडणवीस तुम्हाला पुरुन उरलेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोला.
लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे तसं जसा बाप तशी लेक’, असा निशाणाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर साधला आहे.
अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असं पुढे जाऊन सुप्रिया सुळे सांगतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायेत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायेत, अशी खोचक टीकाही पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली आहे.
