पुण्यात मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ ; तब्बल 20 ते 25 गाड्यांची तोडफोड, आरोपीचा शोध सुरूच

पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात कायदा -सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता पुण्यात सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुंडांनी मधुरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घातला असल्याची माहिती समोर आली आहे. धनकवडी परिसरात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून यात ऑटो रिक्षा, कार आणि स्कूल बसचं नुकसान झालं आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धनकवडीतील केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या भागात मध्यरात्री गुंडांनी तोडफोड केली आहे. गुंडांनी 15 ऑटो रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बस आणि 1 पियागो टेम्पोच्या काचा फोडल्या.तसेच हल्लेखोरांनी दोघांना मारहाणही केली, ज्यामुळे ते जखमी झाले. ही घटना मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडली. काही दिवसांपासून या भागात गुन्हेगारी वाढत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. धुमाकूळ घातलेल्या हल्लेखोराचा पोलिसांकडून अद्याप शोध सुरूच आहे.
काही दिवसांपूर्वी राजू उर्फ बारक्या लोंढे या गुंडानं सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये पेपर स्प्रे मारून राडा घातला होता. त्यामुळे तिथले पोलीस निरीक्षक बदलले.नवीन पोलीस अधिकारी रुजू होताच गुन्हेगारांनी पुन्हा गुंडांनी धुमाकूळ सुरू केला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
