बॉक्स उघडताच उडाले होश; पावडरखाली लपवलेला कोट्यवधींचा माल जप्त, पुणे विमानतळावर मोठी कारवाई…

पुणे : लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त केली आहे. या कारवाईत तब्बल २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तस्करांनी हा माल अत्यंत चलाखीने लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता. सामानामध्ये कौशल्याने लपवलेला हा गांजा तपासणीदरम्यान उघडकीस आला. तस्करीसाठी वापरलेली ही शक्कल पाहून कस्टम्स अधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
कस्टम्स विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित माल जप्त केला असून, या प्रकरणी संबंधित व्यक्तींविरोधात पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांमध्ये या मालात ‘चिनी खाद्यपदार्थ’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. ‘मँडरिन ऑरेंज सॅक्स’ या नावाने हा माल पांढऱ्या थर्माकोल बॉक्समध्ये अत्यंत सुरक्षितपणे पॅक करण्यात आला होता.
मात्र, कस्टम्स अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी या बॉक्सचे स्कॅनिंग केले. स्कॅनिंगदरम्यान मालाचे स्वरूप नैसर्गिक नसल्याचे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला.
अधिकाऱ्यांनी जेव्हा एक बॉक्स उघडला, तेव्हा त्यामध्ये सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांच्या वरच्या भागात मिठासारखी दिसणारी पांढरी पावडर भरलेली होती. मात्र, ही पावडर बाजूला केल्यानंतर आत व्हॅक्युम सीलबंद प्लास्टिक पॅकेट्समध्ये ‘हायड्रोपोनिक गांजा’ लपवलेला असल्याचे उघड झाले. पुढील सखोल तपासणीत संपूर्ण मालाची पाहणी करण्यात आली असता, एकूण ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पुणे कस्टम्स विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, हा माल पुण्यात नेमका कोणाकडे पोहोचणार होता आणि या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचे धागेदोरे किती दूरपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.