हापूस प्रेमींसाठी आनंदाची बातमी! पुण्यात हापूस आंब्याच्या दरात 700 रुपयांची घसरण, जाणून घ्या हापूसचे नवीन दर..

पुणे : आपल्याकडे नुकताच गुढीपाडव्याचा मोठा सण साजरा झाला. गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. यामुळे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न होतो. या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र आमरस आणि पुरणाची पोळी बनवली जाते. यामुळे गुढीपाडव्याच्या काळात दरवर्षी आंब्यांची मागणी वाढते. नेहमीप्रमाणे यंदाही या काळात आंब्यांना मोठी मागणी आली होती.
असे असताना पुणे येथील मार्केट यार्डमध्ये हापुस आंब्यांची मागणी झपाट्याने वाढली होती. या काळात आंब्यांचा पुरवठा दुप्पट होऊन दररोज 1,000 ते 2,000 क्रेट्सवरून 4,000 ते 5,000 क्रेट्सपर्यंत पोहचला होता. मात्र दर जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे जमले नाही.
असे असताना आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हापूस आंब्याच्या दरात तब्बल सातशे रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. यंदा गुढीपाडव्याच्या दरम्यान पुणे येथील मार्केट यार्डमध्ये हापुस आंब्यांची मागणी झपाट्याने वाढली होती. सण झाल्यानंतर हापूस आंब्याच्या मागणीमध्ये घट आली आणि हापुस आंब्यांच्या किमतींमध्ये मोठी घट झाली.
आंब्यांच्या किमतीत मागील आठवड्याच्या तुलनेत जवळपास ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या हापुस आंबा 700 ते 1,200 रुपये प्रति डझन या दरात विकला जात आहे. मागील आठवड्यात किरकोळ विक्रेत्यांकडून हजार ते 1800 रुपये प्रति डझन या दरात हापूसची विक्री केली जात होती. यामुळे आता सर्वसामान्यांना हे दर परवडणार आहेत.
यावर्षी आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीला आंब्यांचा पुरवठा कमी होता. आता अक्षय तृतीयाला आता आंब्याला काय रेट मिळणार याकडे सर्वसामान्यांच्या नजरा राहणार आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील होत आहे.
यामुळे येणाऱ्या काळात दर कमी होणार की वाढणार हे लवकरच समजेल. व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की यामुळे आंब्याच्या पीकाला तात्काळ धोका पोहचणार नाही. पाऊस व वादळांची शक्यता असल्यामुळे आणखी आंबे गळून पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, जो पुरवठ्यात आणखी घट करू शकतो.