समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! आता अपघातांचे प्रमाण होणार कमी, जाणून घ्या…

पुणे : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वाहनचालकांचा आत्मविश्वास वाढला आहे.

तसेच वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी आकर्षक सजावट, भव्य फलक आणि आता ‘लूम अलर्ट’ नावाची नवी संकल्पना लागू करण्यात आली आहे. यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करताना संमोहनाची अवस्था टळते आणि अपघाताचा धोका कमी होतो.
समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी मोठ्या आकाराचे फलक (होर्डिंग्स) लावण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध काही आकर्षक वस्तूही बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष वेगवेगळ्या दिशांनी वळते आणि दीर्घकाळ एकसंध रस्ता पाहून निर्माण होणाऱ्या संमोहनाची स्थिती टाळली जाते.

समृद्धी मार्गावरील अपघातांचे दोन प्रमुख कारणे समोर आली होती. दीर्घ अंतर सलग चालवल्याने चालकाला येणारी एकाग्रतेची झोपट तसेच सिमेंटच्या रस्त्यावर वाहनांच्या टायरवर उष्णतेचा होणारा परिणाम. आता चालक काही वेळ चालवल्यानंतर मध्येच थांबतो, इंधन भरतो, चहा घेतो त्यामुळे एकसंध झापड जाणवत नाही आणि संमोहन टाळले जाते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली एम.एस्सी. आणि एमबीए विद्यार्थिनींनी मिळून ‘लूम अलर्ट’ ही संकल्पना साकारली. या मॉडेलमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपानंतर 50 किमी अंतरावर एक भव्य प्रकाशद्वार उभारण्याची कल्पना आहे.
दरम्यान या प्रवेशद्वारावर मोराच्या आकृतीसह एलईडी लाइट्स, दोन्ही बाजूंनी रंगीबेरंगी एलईडी झाडांची मांडणी आणि झगमगाट असलेली भित्ती रचना प्रस्तावित करण्यात आली आहे.
जेव्हा वाहनचालक या झोनमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याचे लक्ष उजळलेल्या वातावरणाकडे वेधले जाते, आणि त्यामुळे त्याचा थकवा कमी होतो. विशेष म्हणजे समोरून येणाऱ्या वाहनांसाठीही असेच प्रकाशद्वार असणार आहेत. यामुळे वाहनचालक सलग २ ते ५ किमीपर्यंत झगमगाटामध्ये प्रवास करतो आणि संमोहन किंवा झोप येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
दिवसा महामार्गावर अपघातांचे प्रमाण तुलनेत कमी असते, मात्र रात्रीच्या वेळी ७५ ते १०० किमीच्या अंतरावर पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर ‘लूम अलर्ट’ ही संकल्पना गेमचेंजर ठरू शकते. संपूर्ण महामार्गावर दर १०० किमी अंतरावर अशा प्रकाशयुक्त गेट्स उभारण्याची शिफारस संशोधन टीमने केली आहे.