सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात निघणार म्हाडाची लॉटरी, पाहा कुठे किती घरं उपलब्ध?


पुणे : मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वतःचं घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अशा परिस्थितीत म्हाडाची घरे ही नेहमीच सामान्य नागरिकांसाठी आशेचा किरण ठरतात. कमी दरात दर्जेदार घरे उपलब्ध होत असल्यामुळे म्हाडा लॉटरीकडे मोठ्या संख्येने नागरिक आकर्षित होतात.

याच पार्श्वभूमीवर म्हाडाकडून मार्च महिन्यात मोठी घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे आणि कोकण विभागात मिळून सुमारे ३००० घरांसाठी ही लॉटरी काढली जाणार असून, यामुळे हजारो कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाला प्रत्यक्ष आकार मिळणार आहे.

म्हाडा प्रशासनाकडून यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात म्हाडाकडून सुमारे ३००० घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे.

या लॉटरीमध्ये मुंबई, पुणे आणि कोकण मंडळातील विविध प्रकल्पांमधील घरे उपलब्ध होणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात यासंबंधीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता असून, त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

म्हाडाची घरे ही बाजारभावाच्या तुलनेत खूपच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्यामुळे यावेळीही मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, निम्न व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबे आणि पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही लॉटरी मोठी संधी ठरणार आहे.

मुंबई आणि पुण्याबरोबरच कोकण मंडळाअंतर्गत सुमारे ४००० घरांसाठी स्वतंत्र लॉटरी काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोकण पट्ट्यातील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. विविध उत्पन्न गटांचा विचार करून या घरांचे नियोजन करण्यात येत असून, परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार घरे उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, यासोबतच म्हाडाचे अनेक महत्त्वाचे पुनर्विकास प्रकल्प सध्या वेगाने प्रगतीपथावर आहेत. बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, जीटीबी नगरमधील पंजाब कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर आणि अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर यांसारखे प्रकल्प विविध टप्प्यांमध्ये आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!