प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! समोर आली मोठी अपडेट…

नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीएम मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या योजनेचा २१वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची चिन्हे आहेत.

तसेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ही रक्कम वितरित केली जाऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत २० हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१व्या हप्त्याची रक्कम छठ पूजेनंतर, म्हणजेच नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात कधीही जारी केली जाऊ शकते. प्रशासकीय पातळीवर देयक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे कळते.

दरम्यान, या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. म्हणजेच, २१व्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये थेट जमा केले जातील. सुरुवातीला हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल अशी शक्यता होती, पण काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आला. केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. योजनेत पारदर्शकता आणणे आणि फसवणूक टाळणे हा यामागील उद्देश आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले आहे आणि त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, केवळ त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे.
