एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली मोठी घोषणा..


मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी महामंडळाच्या सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे.

यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यात नियमितपणे जमा होईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात मंत्री सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नाला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले.

ते म्हणाले, संपूर्ण महिनाभर अहोरात्र कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होईल, याची एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः वैयक्तिक जबाबदारी घेतो. आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्यात कधीही रखडणार नाही, यासाठी आपण जातीने लक्ष घालू, असे निःसंदिग्ध आश्वासन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमक्ष सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे.

महामंडळाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना, मार्च महिन्याचे वेतन आर्थिक अडचणींमुळे केवळ ५६% इतकेच देता आले, ही वस्तुस्थिती अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी मान्य केले. यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी, गरज पडल्यास राजशिष्टाचार बाजूला ठेवून आपण स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आणि त्यांना विनंती करून एसटीसाठी आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध होईल, याची खात्री करू, असेही ते म्हणाले.

राज्यातील सुमारे १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि परवडणारी परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची खरी ‘लोकवाहीनी’ आहे, असे गौरवोद्गार काढत, एसटी महामंडळाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि परिवहन सेवा अधिक प्रवासीभिमुख व दर्जेदार बनवणे हे आपले मुख्य ध्येय राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!