पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात म्हाडाकडून स्वस्तात मस्त घर खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सर्व माहिती…

पुणे : सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडी, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील इच्छुकांना आता घर घेण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने जाहीर केलेल्या या लॉटरीमध्ये एकूण 4,186 सदनिकांचा समावेश असून, अर्ज करण्याची नवी अंतिम मुदत 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

म्हाडा पुणे मंडळातील लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. अर्जदार 20 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि त्याच दिवशी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रक्कम भरू शकतील. नागरिकांकडून मिळालेल्या मागणीमुळेच म्हाडाने हा निर्णय घेतल्याचे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी सांगितले.

RTGS किंवा NEFT द्वारे पैसे भरण्यासाठी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुणे म्हाडा मंडळाकडून या लॉटरीसाठी जाहीर करण्यात आलेल्या घरांचा समावेश चार वेगवेगळ्या गृहनिर्माण घटकांमध्ये करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत 1,683 सदनिका, असणार आहेत.

दरम्यान, सदनिकांच्या विक्रीसाठी कोणतेही प्रतिनिधी, एजंट किंवा सल्लागार नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी नागरिकांनी म्हाडाच्या हेल्पलाइन क्रमांक 022-69468100 वर संपर्क साधावा. असेही सांगण्यात आले आहे. यामुळे फसवणूक होणार नाही.
दरम्यान, यामध्ये 20 टक्के सर्वसमावेशक योजना अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील एकूण 3,222 सदनिका असा या सोडतीचा विस्तार आहे. 15 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना अंतर्गत पीएमआरडी हद्दीतील 864 सदनिका तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 299 सदनिका असणार आहे.
