पुणेकरांसाठी खुशखबर ; एअर इंडिया एक्सप्रेसची पुण्याहून अबुधाबीला थेट विमानसेवा ; कसं असेल वेळापत्रक ?

पुणे : गेल्या काही काळापासून पुण्यातील प्रवाशांची युरोप, यूएई आणि इतर गल्फ देशांपर्यंत थेट कनेक्टिव्हिटीची मागणी वाढत होती. या मागणीला मिळालेला हा प्रतिसाद देत एअर इंडियाने प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने पुण्यापासून थेट अबु धाबीपर्यंत विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली असून, ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. ही सेवा 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून, पुणेकरांच्या अंतराराष्ट्रीय पर्यटनाला आता वेग येणार आहे.

कसे असेल वेळापत्रक?
पुणे–अबु धाबी थेट विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध असून, पुण्याहून विमान रात्री 20:50 वाजता उड्डाण घेऊन, 22:45 वाजता अबु धाबीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, अबु धाबीहून फ्लाइट 23:45 वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04:15 वाजता पुण्यात पोहचेल.

दरम्यान पुण्यातून दर आठवड्याला तीन थेट उड्डाणे अबु धाबीला जाणार असून, प्रवाशांना गल्फ देशात जाण्यासाठी आता मुंबईतून ट्रान्स्फर घेण्याची गरज राहणार नाही. कामानिमित्त किंवा पर्यटनाच्या उद्देशाने गल्फमध्ये जाणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा आहे.दरम्यान एअर इंडिया एक्सप्रेसने महाराष्ट्रातील हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या हेतूने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यासोबतच नागपूर–बंगळुरू मार्गावरील उड्डाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.