पुणेकरांसाठी खुशखबर! २५०० तरुणांना मिळणार रोजगार, जाणून घ्या काय आहे १० हजार कोटींचा मेगा प्लॅन…

पुणे : पुणेकरांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारा आणि हजारो तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारा एक महाकाय प्रकल्प साकारला जाणार आहे.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १० हजार २१७ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, यामुळे तब्बल २,५०० थेट रोजगार निर्माण होणार आहेत.
चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या माध्यमातून ‘पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प’ विकसित केला जाणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता २१०० मेगावॉट इतकी असेल. या प्रकल्पामुळे केवळ वीजपुरवठा स्थिर होणार नाही, तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सुमारे १०,२१७ कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पुणे आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अंदाजे २,५०० नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.
केवळ पायाभूत सुविधांचा विकासच नव्हे, तर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे राज्याच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होईल, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीला मोठा वेग मिळणार आहे.