लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत केवायसी न झालेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल असून, नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत, तर जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला ही मुदत १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत होती.
मात्र, कमी वेळेत सर्व महिलांना केवायसी पूर्ण करणे शक्य नसल्याने शासनाने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तरीही मोठ्या संख्येने महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे समोर आले.
राज्यात सुमारे ४५ लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची केवायसी अद्याप बाकी असल्याने शासनाकडे मुदतवाढीची मागणी होत होती. अखेर शासनाने ही मागणी मान्य करत केवायसीसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थी महिलांना ३० जानेवारी २०२६ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.