खवय्यांसाठी खुशखबर! फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल, किंमत पाहून व्हाल थक्क…

पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट यार्ड येथे यंदा आंब्याच्या हंगामाची पहिली आवक दाखल झाली आहे. पहिल्या पेटीला तब्बल १५ हजार रुपयांचा भाव मिळाल्याने आंबा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरीतील जलाल काझी जैतापूर येथून आणलेल्या हापूस आणि केशर आंब्याच्या चार पेट्यांनी बाजारात हजेरी लावली. यातील दोन पेट्या हापूस आणि दोन पेट्या केशर आंब्याच्या होत्या. मे. सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर ही पहिली आवक झाली आणि यंदाच्या सर्वाधिक उच्चांकी भावात पहिली पेटी १५ हजार रुपयांना विकली गेली.


ही पेटी युवराज काची यांनी खरेदी केली. एका पेटीत ३ डझन आंबे असून, हा भाव मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस आलेला मोहर जपून ठेवल्यामुळे आंबे लवकर काढता आले.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाचा आंबा सीझन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरळीत सुरू होईल आणि १५ मार्चपासून आवक पूर्ण गतीने वाढेल. सध्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची सुरुवातीची आवक दाखल होत असून, व्यापारी आणि फळविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पहिल्या आवकीला मिळालेल्या उच्च भावामुळे आंबा उत्पादकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले, तर व्यापाऱ्यांमध्ये हंगामाबाबत सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. यंदा हंगामाची सुरुवात या उच्च भावामुळे उत्साहवर्धक ठरली असून, पुणे मार्केट यार्डमध्ये आंबा हंगामाची खरी सुरुवात झाली आहे.
